छत्रपती शाहू महाविद्यालयातील उत्तरपत्रिका तपासणी; ४८ जणांविरुद्ध गुन्हा

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) : येथील छत्रपती शाहू महाविद्यालयातील उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेत अनियमितता झाल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकच्या फिर्यादीवरून कॅप सेंटरसंचालक, प्रा. मधुकर साठे, प्राचार्य डॉ. संदीप राजाभाऊ चिरडे, तांत्रिक सहायक दादासाहेब कन्हळे, अंकुश गंगाराम पडाळे, प्रा. विशाल अशोकराव चपटे यांच्यासह एकूण ४८ जणांविरुद्ध शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्यापीठाचे उपकुलसचिव मनोज नारायण घंटे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार ९ जून ते ४ जुलै २०२५ या कालावधीत उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेत गैरप्रकार करण्यात आला. अधिकृत परीक्षकांची बायोमेट्रिक उपस्थिती घेऊन उत्तरपत्रिका तपासणीची लिंक उघडण्यात आली. त्यानंतर बनावट आयडीचा वापर करून अधिकृत शिक्षक प्रत्यक्ष केंद्रावर उपस्थित नसतानाही उत्तरपत्रिका तपासणी करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 तसेच संबंधित विषयांचे तज्ज्ञ नसलेल्या अनधिकृत शिक्षकांकडून एकूण १९ हजार २३१ उत्तरपत्रिका तपासण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या कामापोटी विद्यापीठाकडून २ लाख ७६ हजार ४१८ रुपये मानधन घेण्यात आले. त्यातील काही रक्कम अनधिकृत शिक्षकांना देऊन विद्यापीठाच्या निधीचा अपहार केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी विविध कलमांनुसार १५ रोजी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक भोजने यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत. या प्रकरणाच्या तपासातून उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेतील अनियमिततेचे अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.